पालखीसाठी महापालिकेची जय्यत तयारी; वारकऱ्यांसाठी सर्वंकष सुविधा

0

पुणे, ता. २४ : आगामी आषाढी वारी व पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने वारकऱ्यांच्या सोयीसाठी सर्वंकष नियोजन सुरू केले आहे. अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पूर्वतयारी बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

पालखी मार्गावरील स्वच्छता, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, वाहतूक व्यवस्थापन, निवारा व्यवस्था आणि सुरक्षा उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. मार्गावरील आवश्यक ठिकाणी पोर्टेबल शौचालये, जेटिंग मशिनद्वारे स्वच्छता, कीटकनाशक फवारणी तसेच पालखी आगमनापूर्वी व प्रस्थानानंतर तातडीने साफसफाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विद्युत विभागाकडून अतिरिक्त प्रकाशयोजना, सीसीटीव्ही देखरेख आणि डीजी बॅकअपची व्यवस्था केली जाणार आहे. आरोग्य विभागामार्फत ४० आरोग्य पथके, ३० डॉक्टर, रुग्णवाहिका सेवा आणि आरोग्य शिबिरांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. वारकऱ्यांसाठी फूट मसाज मशीनचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  गोकुळचा ‘अध्यक्ष’निवड नवा ट्विस्ट; …तरच सतेज पाटलांनाच संधी? फक्त ही नोटीस सर्व २५ संचालकांना विहित वेळेत पाठवणे बंधनकारक

याशिवाय पालखी मार्गावरील खड्डे बुजविणे, अतिक्रमणे हटविणे, बॅरिकेडिंग, पार्किंग व्यवस्था, दिशादर्शक फलक आणि वॉटरप्रूफ मंडप उभारण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. सर्व कामे पालखी आगमनापूर्वी पूर्ण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

या बैठकीला शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त परिमंडळ क्र. ५ माधव जगताप, मुख्य अभियंता (पथ विभाग) सोमनाथ बनकर, मुख्य अभियंता (विद्युत विभाग) मनीषा शेकटकर, मुख्य अभियंता (प्रकल्प विभाग) दिनकर गोजारे, उपायुक्त परिमंडळ क्र. २ अविनाश सपकाळ, माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख तुषार बाबर, उपायुक्त आशा राऊत, अभियंता निखिल मोरे, उपायुक्त अरविंद माळी उपस्थित होते.

अधिक वाचा  बाल्कनीतील कपड्यांवर निर्बंध घालण्यापूर्वी पुणे महापालिकेने कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर कराव्यात: पतित पावन संघटनेची मागणी