“हा लढा स्त्रीत्वाच्या सन्मानाचा”; असभ्य आणि अश्लील भाषेत आरोप रुपालीताईचा लढा सुरू खरात प्रकरणी टीका कोर्टात खेचलं

0

“हा लढा स्त्रीत्वाच्या सन्मानाचा”; असभ्य आणि अश्लील भाषेत आरोप रुपालीताईचा लढा सुरू खरात प्रकरणी टीका कोर्टात खेचलं

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उठलेले वादळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. या प्रकरणात झालेल्या चौफेर टीकेनंतर आता राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आक्रमक झाल्या आहेत. टीव्ही डिबेट्स आणि सोशल मीडियावरून टीका करणाऱ्यांविरोधात रुपाली चाकणकरांनी आता थेट न्यायालयीन कायदेशीर लढाई सुरू केली आहे.

माजी नगरसेविका आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आशा मिरगे यांच्याविरोधात रुपाली चाकणकर यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांना नोटीस बजावल्याचे सांगितले. आशा मिरगे यांनी बजावलेली नोटीस न स्वीकारल्यामुळे रुपाली चाकणकर यांनी माझगाव न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केला. त्यानंतर न्यायालयाने याची गंभीर दखल घेत मिरगे यांना २ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. स्वतः चाकणकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या कायदेशीर कारवाईची माहिती दिली.

अधिक वाचा  चंद्रकांतदादांच्या रणनीतीमुळे पुणे ‘शिक्षक’ची अशक्य जागा विजयी; पण सर्वत्र धुमधडाका करूनही ‘पदवी’मात्र मिळाली नाही

मिरगे यांचे नेमके आरोप काय होते?

काही महिन्यांपूर्वी अशोक खरात याला महिलांचे लैंगिक आणि आर्थिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर खरातसोबत रुपाली चाकणकर यांचा एक पाद्यपूजेचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता. या मुद्द्यावरून आशा मिरगे यांनी चाकणकरांवर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले. चाकणकर अनेक महिलांना स्वतःहून खरातकडे घेऊन जायच्या, असा दावा मिरगे यांनी केला होता. तसेच खरातच्या आर्थिक व्यवहारात आणि जमिनीच्या भागीदारीत काही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांसह रुपाली चाकणकर यांचा सहभाग असल्याचा थेट आरोप त्यांनी केला होता.

तीन वेळा नोटीस नाकारली; आता कोर्टाचे समन्स

या आरोपांना उत्तर देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, “गेल्या दीड-दोन महिन्यांत कोणत्याही पुराव्याशिवाय माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अत्यंत असभ्य आणि अश्लील भाषेत आरोप केले गेले, जे अतिशय वेदनादायक होते. या विकृतीला चपराक देण्यासाठी मी ४ एप्रिल रोजी आशा मिरगे यांना पहिली कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र, कायद्याच्या भीतीपोटी त्यांनी ती स्वीकारली नाही. पोस्टाद्वारे तब्बल तीन वेळा पाठवलेली नोटीस अनक्लेम म्हणून परत आली. अखेर मी माझगाव न्यायालयात फौजदारी फिर्याद दाखल केली. न्यायालयाने याची दखल घेत आशा मिरगे यांना २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कोर्टात हजर राहण्याचा कडक आदेश दिला आहे.”

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?

माझा लढा स्त्रीत्वाच्या सन्मानाचा: रुपाली चाकणकर

आपली बाजू स्पष्ट करताना चाकणकर यांनी सांगितले की, खरातच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी किंवा जमिनीच्या वाटणीशी त्यांचा संबंध नाही. इतर हजारो भाविकांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबाने खरातला केवळ एक आध्यात्मिक गुरू मानले होते आणि तो पाद्यपूजेचा व्हिडिओ अत्यंत जुना आहे, जेव्हा त्या महिला आयोगाच्या अध्यक्षही नव्हत्या.त्या पुढे म्हणाल्या, “या प्रकरणाचा तपास पूर्णपणे पारदर्शक व्हावा म्हणून मी स्वतःहून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तरीही माझ्या बदनामीचे षडयंत्र रचले गेले. एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून माझे खोटे व्हिडिओ बनवले गेले. हा छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ आणि सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे, जिथे संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न या विकृत लोकांनी केला आहे.”

अधिक वाचा  शासन आदेश ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणालाच प्राधान्य; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे, नाले खोलीकरण

दिल्ली हायकोर्टाकडूनही इतर नेत्यांना नोटिसा

या प्रकरणात केवळ आशा मिरगेच नव्हे, तर इतर काही महिला नेत्यांनीही चाकणकरांवर टीका केली होती. या सर्वांचा उल्लेख करत चाकणकर यांनी, पुराव्याशिवाय वक्तव्ये करून चिखलफेक करणाऱ्या इतर सर्व महिलांनाही दोन दिवसांपूर्वी दिल्ली हायकोर्टाकडून नोटिसा पाठवण्यात आल्याचे सांगितले.

“२ जुलैला मी स्वतः माझगाव कोर्टात हजर राहणार असून दिल्ली हायकोर्टातही मी स्वतः उपस्थित राहून हा लढा लढणार आहे. हा लढा इथून पुढे कोणत्याही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडू नयेत यासाठी, म्हणजेच स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी आहे,” असं चाकणकरांनी म्हटले.