IPL 2026 गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीनं Tata Sierra कारसह ५ पुरस्कार जिंकले मूर्ती लहान, कीर्ती महान! 

0

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील १९ वा हंगाम १५ वर्षीय स्फोटक बॅटर वैभव सूर्यवंशीनं गाजवला. राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून विक्रमांची ‘बरसात’ करणाऱ्या वैभव सूर्यवंशीनं ऑरेंज कॅप, Tata Sierra Car सह पाच पुरस्कार जिंकत अनोखा विक्रम आपल्या नावे केला. IPL च्या इतिहासातच नव्हे तर क्रिकेट जगतात वयाच्या १५ व्या वर्षी कोणत्याही खेळाडूला एका स्पर्धेत एवढे पुरस्कार मिळाल्याची नोंद नाही.

फायनल न खेळता वैभव सूर्यवंशीची हवा!

रजत पाटीदारच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने घरच्या मैदानात गुजरात टायटन्सला पराभूत करत जेतेपदाचा बचाव करत इतिहास रचला. दुसरीकडे अनेक पुरस्कारांसह लाखो रुपयांचे रोख बक्षीस मिळवत वैभव सूर्यवंशीनं सर्वांचे लक्षवेधून घेतले. अवघ्या १५ वर्षी वैभव सूर्यवंशीनं १६ सामन्यातील १६ डावात ४८.५० च्या सरासरीसह २३७.३० च्या स्ट्राइक रेटसह ७७६ धावा कुटल्या. यात त्याने एका शतकासह ५ अर्धशतके झळकावली.

अधिक वाचा  २-२-१ वारं फिरलं..! शिक्षक-पदवीधर निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना ‘कही खुशी कभी गम’चा धक्का; धक्कादायक अंदाज

‘इलेक्ट्रिक सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन’

वैभव सूर्यवंशीने सर्वोच्च स्ट्राईक रेटच्या जोरावर ‘इलेक्ट्रिक सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन’चा पुरस्कार पटकवला. या पुरस्कारासाठी किमान ७ सामने खेळलेले आणि १०० चेंडूंचा सामना केलेले फलंदाज पात्र ठरतात. वैभवने २३७.३० च्या स्ट्राइक रेट रेटसह फिन ॲलन (२१४.११), प्रियांश आर्य (२११.६२) आणि अभिषेक शर्मा (२०४.७२) यांना मागे टाकत या पुरस्कारासाठी त्याला Tata Sierra कार बक्षीस स्वरुपात जिंकली.

सर्वाधिक षटकारांसाठी पुरस्कार

वैभव सूर्यवंशीने संपूर्ण हंगामात ७२ षटकार ठोकले. या कामगिरीसाठी त्याला ट्रॉफीसह १० लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. यंदाच्या हंगामात या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अभिषेक शर्मा आहे. ज्याने ४३ षटकार ठोकले. याशिवाय RCB चा कर्णधार रजत पाटीदार याच्या खात्यात ४१ षटकारांची नोंद आहे.

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?

‘इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन’

वैभवला ‘इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले. या पुरस्कारासाठी १ एप्रिल २००० नंतर जन्मलेले, या हंगामापूर्वी २५ पेक्षा कमी IPL सामने खेळलेले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले खेळाडू पात्र ठरतात. त्याने प्रियांश आर्य आणि प्रिन्स यादव यांना मागे टाकत हा पुरस्कार जिंकला.

‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन’

IPL 2026 मधील सर्वात प्रतिष्ठेचा वैयक्तिक पुरस्कारही वैभवनेच जिंकला. त्याला ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन’ घोषित करण्यात आले. वैभवचे एकूण ४३६.५ गुण कमावत पर्पल कॅप विजेत्या कगिसो रबाडाला मागे टाकले. या पुरस्कारासाठी वैभवला १५ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.

अधिक वाचा  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत ९१.०८ टक्के मतदान; शांततेत निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार

ऑरेंज कॅप

वैभव सूर्यवंशी याने यंदाच्या हंगामात ७७६ धावा करत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी राहिला. त्याच्यापाठोपाठ या यादीत शुभमन गिल (७३२ धावा) आणि साई सुदर्शन (७२२ धावा) दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिला. या पुरस्कारासाठी वैभवला १० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.