पुणेकरांनो, काळजी घ्या! हवामानात अचानक बदल; वेधशाळेने दिला ‘हा’ इशारा

0

पुणे शहरात उन्हाचा चटका वाढला असून, उकाड्याने पुणेकर घामाघूम झाले आहेत. बुधवारी (दि. २७) मगरपट्टा परिसरात उष्णतेचा पारा ३९.१ अंशावर पोहचला. एकीकडे उष्णतेचा पारा वाढत असताना, शहरासह जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवसात उन्हाचा चटका वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी पडतील. त्यानंतर हवामान कोरडे आणि दुपारनंतर आकाश ढगाळ राहील.

मागील आठवड्यात शहरासह जिल्ह्यात सलग दोन दिवस पूर्वमोसमी पावसाने धुमाकुळ घातला. परिणामी उष्णतेचा पारा ३२ ते ३४ अंशापर्यंत खाली आला आणि रात्री हवेत गारवा वाढल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसात हवामानातील बदलामुळे कमाल तापमानात दररोज एक ते दीड अंशाने वाढ झाली.

अधिक वाचा  विधान परिषद 5 जागांसाठी आज मतदान 182 उमेदवार रिंगणात; सर्वत्र बंडखोरीची धास्ती पण ‘मैत्रीपूर्ण’ लढतचा मुलामा!

आजही अर्धा ते एक अंशाने कमाल तापमानात वाढ झाल्याने मगरपट्टा परिसरात पारा ३९ अंशाच्या पुढे गेला. त्यापाठोपाठ पाषाण येथे ३७.८, शिवाजीनगर येथे ३७.६, कोरेगाव पार्क ३७.५, हवेली ३७.४, वडगावशेरी ३६.५, चिंचवड आणि हडपसरमध्ये ३६, एनडीए येथे ३५.४ तर शिरूर परिसरात ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, बुधवारी दिवसभरात कमाल तापमानात काही अंशी वाढ झाली आणि आकाश निरभ्र असल्यामुळे दुपारी उन्हाचा चटका चांगलाच जाणवत होता. दुपारी शहरासह उपनगरात ढगाळ वातावरण झाल्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता वाटत होती. मात्र, पावसाने हुलकावणी दिली आणि उकाडाही वाढला.

अधिक वाचा  पुणेकरांनो, उन्हाचा चटका आणखी वाढणार! मंगळवारपासून कमाल तापमान ३६ अंशांवर जाण्याचा अंदाज