शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक, 15 मतदारसंघातील उमेदवार ठरले; एबी फॉर्मही दिले?

0

आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची आज मातोश्रीवर बैठक संपन्न झाली. शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली असून रुग्णालयातून घरी आल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या अनुंषगाने तयारी सुरू केलीय. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यमान आमदारांना मार्गदर्शन केले. ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहिलेल्या विद्यमान आमदारांमधील बहुतांश आमदारांची उमेदवारीही निश्चित मानली जात आहे. यादी जाहीर होण्याची वाट बघू नका, तुमच्याबाबतीत ती सर्व औपचारिकता आहे, असे म्हणत आजच्या बैठकीमध्ये विद्यमान आमदारांना एबी फॉर्म देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती आहे. तसेच, 22 ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचनाही या उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे, आजच्या बैठकीकडे राज्यातील शिवसेना व ठाकरे गटाचे नेते लक्ष लागले होते.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली असून 20 नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान होत आहे. तर, 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार असून उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 29 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे, महायुती व महाविकास आघाडीकडून लवकरात लवकर उमेदवारांची यादी जाहीर करुन उमेदवारांना प्रचारासाठी मैदानात उतरवले जाणार आहे. त्यामुळे आजच विद्यमान आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षप्रमुखांकडून एबी फॉर्म दिले गेल्याची सुत्रांची माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाचे एकूण 15 विद्यमान आमदार या बैठकीला उपस्थित होते. त्यातील बहुतांश आमदारांचे विधानसभा निवडणुकीचे तिकीट निश्चित मानले जात आहे. ज्या आमदारांना मुहूर्तावर एखादा दिवस ठरवून एबी फॉर्म घेऊन जायचं आहे, ते आमदार त्यादिवशी एबी फॉर्म घेऊन जातील, असेही समजते. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ उद्या राज्य निवडणूक आयोगाला भेटणार आहे. लोकसभा निवडणुकांवेळी ज्या काही त्रुटी महाविकास आघाडीतील पक्षांना जाणवल्या, त्या दृष्टिकोनातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तक्रारींचे निवारण राज्य निवडणूक आयोगाने करावे, यासाठी ही भेट असल्याचे देखील या बैठकीतील उपस्थित आमदारांकडून समजते.

अधिक वाचा  Fssaiची घटनाबाह्य समांतर अंमलबजावणी यंत्रणा; तुकाराम मुंडेची थेट मुंबई हायकोर्टात धाव, अधिकार हिरावून घेतले नेमका दावा काय?

शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान 15 आमदार

१) आदित्य ठाकरे
२) अजय चौधरी
३) राजन साळवी
४) वैभव नाईक
५) नितीन देशमुख
६) सुनिल राऊत
७) सुनिल प्रभू
८) भास्कर जाधव
९) रमेश कोरगावंकर
१०) प्रकाश फातर्फेकर
११) कैलास पाटिल
१२) संजय पोतनीस
१३) उदयसिंह राजपूत
१४) राहुल पाटिल
१५) ऋतुजा लटके