किराणा दुकानातून तब्बल 4 कोटी 50 लाखांचं ड्रग्ज जप्त, दुकानदाराला अटक

0

निवडणूक काळात पैसा आणि दारुंचा धुरळा उडत असतो, अनेकदा गावागावात कार्यकर्त्यांच्या पार्ट्यांची मैफील जमत असते. मात्र, निवडणूक काळात पोलीस यंत्रणाहीअतिशय सतर्क असते. त्यामुळेच, अवैध दारुवाहतूक असेल, अमली पदार्थांची वाहतूक असेल किंवा बेहिशोबी मालमत्ता असेल, पोलिसांची करडी नजर असते. पोलिसांकडून कसोशीने तपासयंत्रणा राबविण्यात येते. मात्र, तरीही गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येतात.आता, कल्याण क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका किराणा दुकानातून तब्बल साडे चार कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. या घटनेनं अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

अधिक वाचा  केंद्र सरकारचा मोठा निर्णय निर्बंध हटवले, चांदी स्वस्त होणार… सहा महिन्यांसाठी 6500 मेट्रिक टन चांदी आयातीला मंजुरी

उल्हासनगर शहरातील हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका किराणा दुकानातून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने साडेचार कोटी रुपयांच्या किमतीचं ड्रग्स जप्त केलं असून ड्रग्स डीलर दुकानदारालाही अटक करण्यात आली आहे. तर, या घटनेमागील मास्टरमाईंड मुख्य ड्रग्स डीलर अद्यापही फरार आहे. दरम्यान, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली.

अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी येथील गायत्री किराणा दुकानांमध्ये मोफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचला खबऱ्याकडून समजली. त्यानंतर, कल्याण क्राईम ब्रँचने तत्काळ या किराणा दुकानात धाड टाकत 3 किलो एमडी जप्त केले, या एमडी ड्रग्जची किंमत 4 कोटी 52 लाख 29 हजार रुपये एवढी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अधिक वाचा  गोकुळचा ‘अध्यक्ष’निवड नवा ट्विस्ट; …तरच सतेज पाटलांनाच संधी? फक्त ही नोटीस सर्व २५ संचालकांना विहित वेळेत पाठवणे बंधनकारक

दरम्यान, कल्याण क्राईम पोलिसांनी आरोपी दुकानदार राजेश कुमार प्रेमचंद तिवारी याला बेड्या ठोकले आहेत. तर, मुख्य आरोपी शैलेंद्र राकेश अहिरवार हा फरार झाला असून पोलिस याचा शोध घेत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मुंबईसह उपगनगरातील अंमली पदार्थांच्या घटनांमुळे तरुणाई कोणत्या दिशेला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, विशेषत: एमडी मोफेड्रॉन ड्रग्ज जप्त केलं जात आहे.