जरंडेश्वरची १०३ कोटी मालमत्ता ८२६ कोटी कर्ज; कंपनीचा माञ हा वेगळाच घाट: ईडी आरोपपत्रात

0

‘साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची २३५ एकर जमीन, तसेच कारखाना, यंत्रे, इमारत बांधकाम इत्यादी मालमत्ता अवैधरित्या ताब्यात घेण्याचा घाट जरंडेश्वर शुगर मिल्स कंपनीने घातला. त्यासाठी मुंबईतील ओमकार ग्रुपच्या केवळ नावाला असलेल्या गुरू कमॉडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा वापर करण्यात आला. त्या कंपनीने कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत भाग घेऊन ती मालमत्ता खरेदी करून लगेचच जरंडेश्वर शुगरकडे दीर्घ भाडेपट्ट्याने दिली. या साऱ्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक), जरंडेश्वर शुगर आणि गुरू कमॉडिटीच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या संगनमत व कटाचा तपास सुरू आहे’, असे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

अधिक वाचा  दुसरी पसंती ठरवणार पुण्याचा शिक्षक आमदार, नेमकं गणित काय? निकालाआधीच सोप्या शब्दात समजून घ्या

‘जरंडेश्वर शुगर आणि गुरू कमॉडिटीच्या संचालकांनी शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकून आपल्या मर्जीप्रमाणे काम करण्यास भाग पडले. तसेच साखर कारखान्याच्या मालमत्ता अवैधरित्या कवडीमोल किंमतीत मिळवल्या. त्यामुळे त्यांनी पीएमएलए कायद्याच्या कलम ३ व ७०अन्वये मनी लाँड्रिंगचा गुन्हा केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. गुन्ह्यातील पैशांचे जरंडेश्वर शुगर कंपनीतील लाभार्थी कोण, जरंडेश्वर शुगर आणि गुरू कमॉडिटीमधील संबंध, लिलावानंतर जरंडेश्वर कारखान्याच्या मालमत्ता या गुरू कमॉडिटीच्या मालकीच्या झाल्या असताना आणि कारखान्याच्या मालमत्तांचे मूल्य तज्ज्ञामार्फत १०३ कोटी रुपये निश्चित झालेले असताना जरंडेश्वर शुगरने सहकारी बँकांकडून तब्बल ८२६ कोटी रुपयांची कर्जे कशी मिळवली, अशा अनेक मुद्द्यांचा अधिक तपास सुरू आहे. कारखान्यात साखर साठा नसतानाही त्याच्या नावाखाली जरंडेश्वर शुगरने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ८९ कोटी रुपयांचे कर्ज मिळवले.

अधिक वाचा  चंद्रकांतदादांच्या रणनीतीमुळे पुणे ‘शिक्षक’ची अशक्य जागा विजयी; पण सर्वत्र धुमधडाका करूनही ‘पदवी’मात्र मिळाली नाही

गुरू कमॉडिटीने कारखान्याच्या सर्व मालमत्ता या जरंडेश्वर शुगरला वार्षिक अवघ्या १२ लाख रुपये दराने दीर्घ भाडेपट्ट्यावर दिल्या. तसेच काही कोटी रुपये अनामत ठेवीच्या नावाखाली घेतल्या. मात्र, त्यातील बहुतांश रक्कम नंतर जरंडेश्वर शुगरला परत दिली. त्यामुळे गुरू कमॉडिटी ही केवळ फ्रंट कंपनी असून कारखान्याच्या मालमत्तांची खरी मालकी जरंडेश्वर शुगरकडेच असल्याचे तपासातून स्पष्ट होते. या साऱ्याचा अधिक तपास आणि सर्व संशयितांची भूमिका तपासण्याचे काम सुरू असल्याने पुरवणी आरोपपत्रात तपशील देण्याची अनुमती द्यावी’, असेही ‘ईडी’ने आरोपपत्रात म्हटले आहे.

आणखी तपशील उघड होतील
‘जरंडेश्वर शुगर कंपनीशी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व अन्य निकटवर्तीयांचा संबंध आहे आणि त्या निकटवर्तीयांनी साखर कारखान्याच्या मालमत्ता या कवडीमोल किंमतीत मिळवल्याचे प्रथमदर्शनी दिसते’, असे गंभीर निरीक्षण विशेष न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेताना आदेशात नुकतेच नोंदवले आहे. त्या पार्श्वभूमीवर, ‘ईडी’च्या भविष्यातील पुरवणी आरोपपत्रातून जरंडेश्वर घोटाळ्याचे आणखी तपशील उघड होतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

अधिक वाचा  देवेंद्र फडणवीसांनी 25 किलो वजन 56व्या वर्षी कसं कमी केलं? त्यांच्या फिटनेसच्या सहज सुलभ गोष्टी सर्वांना शक्य