अजितदादांचा काँग्रेसला मोठा दणका; ‘स्थानिक’च्या निवडणुकीपूर्वी नांदेडमध्ये ताकद वाढणार; दोन बडे नेते करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

0

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं होतं, काँग्रेस हा राज्यात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला होता. तर दुसरीकडे महायुतीला मोठा दणका बसला, अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर महायुतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार पुनरागमन केलं. महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं आणि पुन्हा एकदा राज्यात महायुतीची सत्ता आली. महायुतीच्या राज्यात तब्बल 232 जागा निवडून आल्या, तर महाविकास आघाडीचे तीन प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांना केवळ 50 जागांवरच समाधान मानावलं लागलं.

अधिक वाचा  भाजप-शिवसेना युती तुटण्याच्या स्थितीत! राजकीय भूकंपही शक्य? एकनाथ शिंदेंची किंमत फक्त १२ जागा

विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आता महाविकास आघाडीसाठी आणखी एक विषय डोकेदुखी ठरत आहे. तो म्हणजे महाविकास आघाडीमधील अनेक नेते सध्या महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आतापर्यंत महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. ही गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता महाविकास आघाडीसमोर आहे. त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे आणि काँग्रेसचे नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासोबतच मीनल खतगावकर या देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत

काँग्रेसकडून भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर नायगाव विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता खतगावकर कुटुंब राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्या उपस्थित लवकरच हा पक्षप्रवेश होणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशानंतर आता भास्करराव पाटील खतगावकर देखील राष्ट्रवादीत जाण्याची शक्यात आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी नांदेडमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट