पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने पुण्याहून आणखी चार वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पुण्यापासून दोन वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन धावत असून ही संख्या आता सहा होणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे आता प्रवासाला अधिक गती मिळणार असून पुणेकरांचा प्रवास आणखी जलद आणि सोपा होणार आहे.






सद्यस्थितीत पुण्यातून दोन वंदे भारत एक्सप्रेस कार्यरत आहेत. या गाड्या पुणे-हुबळी, पुणे-कोल्हापूर आणि मुंबई-सोलापूर व्हाया पुणे या मार्गांवरून धावतात. आता नव्या अतिरिक्त वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांमुळे इतर ठिकाणी जातानाही प्रवासाचा वेळेची वाचणार आहे. याचा पुणेकरांना फायदा होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन चार वंदे भारत एक्सप्रेस पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते बेळगाव या चार मार्गांवर धावणार आहेत. या एक्सप्रेस ट्रेन लवकरच सुरु होतील, अशी माहिती आहे. प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातं आहे.
पुणे-कोल्हापूर या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट ५६० रुपये आहे. तर विशेष कोचची तिकीट १,१३५ रुपये आहे. ही एक्सप्रेस बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे तीन दिवशी धावते. याशिवाय पुणे-हुबळी मार्गिकेवर प्रवास करायचा असल्यास त्याचे तिकीट १,५३० रुपये इतके आहे, तसेच विशेष कोचचे तिकीट २,७८० इतके आहे.











